ध्वनी प्रदूषण तुम्ही काय करू शकता...
दिवसभर थकून आल्यावर तुम्हाला गाढ झोप लागते. पण, अचानक शेजाऱ्यांच्या कुत्र्यांच्या भुंकण्याने तुमची झोपमोड होते. तुम्ही कूस बदलता आणि केकाटणे आताच थांबेल, मगच थांबेल अशी वाट पाहत राहता. पण भुंकणे काही केल्या थांबत नाही. कुत्र्यांचे केकाटणे चालूच राहते. तुमचे डोके उठते, झोपमोड झाल्यामुळे चिडचिड होते आणि सगळी झोप उडून गेलेली असते; असला हा त्रास तुमच्या शेजाऱ्यांना सहन तरी कसा होतो असा तुम्ही विचार करता.
प्रत्येकाची आवाज सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. धावपट्टीच्या जवळपास राहणाऱ्या विमानतळाच्या कामगारांना विमानाच्या आवाजाचा तितका त्रास होत नाही जितका विमानांशी काहीच संबंध नसलेल्या ठिकाणी काम करणाऱ्यांना होतो. एखाद्या गृहिणीला इलेक्ट्रिक फूड प्रोसेस्सरचा आवाज, दुसऱ्या खोलीत पुस्तक वाचत किंवा टीव्ही पाहत बसलेल्या व्यक्तीपेक्षा निश्चितच अधिक सहन करता येतो.
ध्वनी प्रदूषण म्हणजे काय?
वेगवेगळी राष्ट्रे ध्वनी प्रदूषणाची व्याख्या निरनिराळ्या पद्धतीने देतात. मेक्सिकोत, “इतरांना त्रासदायक किंवा अपायकारक असलेला कोणताही नकोसा असणारा आवाज” म्हणजे गोंगाट. न्यूझीलंडमध्ये, “कोणाच्याही शांतीचा, आरामाचा आणि सुविधेचा विनाकारण भंग करणारा” कोणताही आवाज त्रासदायक मानला जातो.
टेलिफोनचा शोध लावलेले अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल आणि जर्मन भौतिकीविज्ञ हाइनरिक हट्र्झ या दोन प्रख्यात वैज्ञानिकांचा ध्वनी मापनाशी जवळचा संबंध आहे. बेल किंवा सहसा डेसिबेल म्हटले जाणारे (बेलचा एक दशांश), तुलनात्मक आवाजाच्या प्रखरतेचे मापन करते तर हट्र्झने ध्वनीचा ध्वनीस्तर किंवा वारंवारता मापली जाते. ध्वनी मापन केले जाते तेव्हा अहवालांमध्ये सहसा ध्वनीची डेसिबेल पातळी दाखवली जाते.*
पण एखाद्या आवाजामुळे किती त्रास होतो हे कोणी ठरवायचे? तुम्हीच, म्हणजे ऐकणाऱ्यानेच! “आवाज त्रासदायक आहे की नाही हे ओळखणारे सर्वात उत्तम यंत्र म्हणजे मानवी कान,” असे लंडनचे द इंडिपेंडेंट म्हणते.
ध्वनीचे परिणाम
कान हे ध्वनी ओळखण्याचे “सर्वात उत्तम यंत्र” असल्यामुळे त्यालाच जास्त हानी होते हे काही वेगळे सांगायला नको. तुमच्या अंतकर्णाच्या संवेदनशील तंत्रिका कोशिकांना इजा पोचल्याने कायम स्वरूपाचा श्रवण दोष होऊ शकतो. उच्चस्वरी आवाजाप्रती लोक विविध तऱ्हेने प्रतिक्रिया दाखवतात हे खरे. पण, ८० ते ९० डेसिबेलपेक्षा उच्चस्वरी आवाज सतत ऐकत राहिल्याने हळूहळू श्रवणशक्ती कमी होऊ शकते. खरे तर, आवाज खूपच जास्त असेल तर तुमच्या श्रवणशक्तीला इजा पोचू नये म्हणून त्या वातावरणात तुम्हाला कमीत कमी वेळ राहावे लागेल.
नव वैज्ञानिक (इंग्रजी) पत्रिका असे वृत्त देते, की फ्रान्समध्ये विकल्या जाणाऱ्या पुष्कळ व्यक्तिगत स्टेरिओंचा कमाल ध्वनी ११३ डेसिबेल असतो. त्यात एका अभ्यासाचा उल्लेख केला होता आणि त्या अभ्यासानुसार “व्यक्तिगत कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयरवरती एका तासासाठी एकदम जोरात लावलेले रॉक संगीत बहुधा १०० डेसिबेलपेक्षा अधिक होते आणि कधीकधी तर चक्क १२७ डेसिबेल इतकेही होते.” लाईव्ह कॉन्सर्टच्या वेळी होणाऱ्या आवाजाचा परिणाम तर याहीपेक्षा घातक असतो. एका संशोधकाने पाहिले की, काही लोक लाऊडस्पीकर जिथे ठेवले होते तिथे शुद्धी हरपलेल्या अवस्थेत गर्दी करून उभे होते. तो म्हणतो, “माझ्या डोळ्यांपुढं अंधारी येत होती, त्या बास ठोक्यांमुळं मी सुन्न झालो होतो आणि माझ्या कानठाळ्या बसत होत्या.”
आवाजाचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो? एका अधिकारसूत्रानुसार: “मध्यम ते उच्चस्वराच्या सतत आवाजांमुळे तणाव, थकवा आणि चिडचिड निर्माण होऊ शकते.” “आवाजाच्या त्रासामुळे फक्त माणूस वैतागूनच जात नाही, तर तो शारीरिक आणि भावनिकरित्याही अगदी गळून जाऊ शकतो,” असे जर्मनीच्या गीसन विद्यापीठाचे प्राध्यापक गेरॉल्ट फ्लायशर म्हणतात. इतर तणावपूर्ण स्थितींखेरीज आवाजाचाही त्रास होत असल्यास, खिन्नता आणि आंगिक रोगही उद्भवू शकतात, असे प्राध्यापक मॉकीस त्सॉपोगॉस यांचे म्हणणे आहे.
सततच्या आवाजामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होऊ शकतो. ब्रिटिश सरकारच्या संशोधकांनी जेव्हा ध्वनी प्रदूषणाच्या पीडितांना, गोंधळ करणाऱ्या लोकांविषयी त्यांना काय वाटते असे विचारले तेव्हा त्यांनी द्वेष, बदला आणि खून यांचाही उल्लेख केला. दुसऱ्या बाजूला पाहता, गोंधळ करणाऱ्या लोकांची वारंवार तक्रार केली जाते तेव्हा ते क्रोधित होतात. “आवाजामुळे इतरांच्या हिताविषयीची जाणीव कमी होते आणि क्रोध आणि वैरभाव निर्माण होतो,” असे एका आवाजविरोधी मोहिमेत भाग घेणाऱ्याचे म्हणणे आहे.
ज्यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो अशांना हळूहळू तो सहन होईनासा होतो असे दिसून आले आहे. त्यांचे मत या स्त्रीसारखेच आहे जिचे शेजारी दिवस न् रात्र अगदी मोठ्याने संगीत वाजवायचे.
source-Jw.org
Comments
Post a Comment